नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर  – जिल्ह्यातील १२ नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्त निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात भेटी देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


कोपरगाव, संगमनेर व शिर्डी नगरपरिषदांसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (भा. प्र. से.), तर राहाता, देवळाली प्रवरा व राहुरीसाठी नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग श्रीपती मगदूम निरीक्षक म्हणून कार्य करतील. श्रीरामपूर, शेवगाव व नेवासा क्षेत्रांसाठी जळगावचे अपर जिल्हाधिकारी श्रीमंत चांगदेव हारकर, तर पाथर्डी, श्रीगोंदा व जामखेड नगरपरिषदांसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल (भा. प्र. से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


निवडणूक निरीक्षकांना मतदान केंद्रांची उपलब्धता व सोयी-सुविधा, कर्मचारी व प्रशिक्षणव्यवस्था, स्ट्रॉंग रूम व मतमोजणीची तयारी तसेच विभागांमधील समन्वय यांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा तसेच आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण, पेड न्यूज व सोशल मीडिया निरीक्षण याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 


नामनिर्देशन छाननीपासून ते मतदान व मतमोजणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा आढावा घेऊन संबंधित अहवाल विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post