दि. ८-९ नोव्हेंबरला रंगणार साहित्य संमेलन; संयोजन समितीतर्फे निवड जाहीर
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती तथा संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष लेखक सचिन मोहन चोभे यांनी ही निवड जाहीर केली. दिनांक ८-९ नोव्हेंबर २०२५ असे दोन दिवसांचे साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याबद्दल अधिक माहिती देताना संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सांगितले की, संमेलन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा फोनवरून शुभेच्छा व सर्वोतोपरी मदत करण्याचा विश्वास दिला. त्यातही साहित्यरसिक असलेल्या सचिन जाधव यांचा समावेश होता. त्यानंतर संयोजन समितीमधील अनेकांनी त्यांच्या निवडीचा आग्रह धरला. त्यानुसार समितीने सचिन जाधव यांची भेट घेऊन संमेलनाच्या स्वागताध्यक्ष या महत्वाच्या पदावर काम करण्यासाठीची विनंती केली. त्यांनीही मग अशा महत्वाच्या साहित्यिक कार्यक्रमात सहभागी होत संमेलन यशस्वी करण्यासाठीच्या प्रयत्नात सहभागी होत स्वागताध्यक्ष पद स्वीकारण्याची विनंती मान्य केली. त्यानुसार संयोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे आवाहन
या निवडीबद्दल अधिक माहिती देताना स्वागताध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले की, आतापर्यंत संयोजन समितीने जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महत्वाचे साहित्यिक आणि कवी यांना निमंत्रित केले आहे. कल्याण रोडवरील सुखाकर्ता लॉन व मंगल कार्यालयात होणाऱ्या या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील सर्व साहित्यिक चळवळ सहभागी होत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर आणि सावेडी शाखेसह शब्दगंध साहित्यिक परिषद यांनीही यासाठी सर्वोतोपरि मदत केली आहे. त्यामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल याचा विश्वास वाटतो. संमेलनाध्यक्ष कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक यामध्ये सहभागी होत आहेत. माझ्यासारख्या साहित्यरसिकास संयोजन समितीने ही संधी दिली आहे. तसेच संमेलनात अनेक महत्वाच्या सत्रामध्येही माझ्यासारख्या साहित्यरसिक व वाचकांना महत्वाची संधी देण्याचा संयोजन समितीचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.
संमेलन म्हणजे साहित्यिक-वाचकांमधील सेतुबंधन
याबद्दल अधिक माहिती देताना आयोजक संस्था आत्मनिर्धार फाऊंडेशनचे (निंबळक, ता. नगर) अध्यक्ष महादेव गवळी यांनी सांगितले की, सर्व घटकांना सहभागी करून घेऊन संमेलनास वाचकाभिमुख करण्याचा प्रयत्न संयोजन समितीचा आहे. त्यानुसार नगर तालुक्यातील आठवड हे मूळ गाव असलेल्या आणि नगर शहराच्या राजकीय व व्यावसायिक विश्वात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेल्या साहित्यरसिक सचिन जाधव यांची स्वागताध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. तर, निमंत्रण समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र चोभे-पाटील यांचीही निवड करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने आम्ही साहित्यरसिक आणि कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कारप्राप्त वाचक बेबीताई गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथफेरीची सुरुवात, तर लेखिका व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या माहेश्वरी गावीत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करणार आहोत. साहित्यरसिक संध्याताई मेढे, मुख्याध्यापिका संगीता जाजगे, विलास साठे, शरदकुमार मेढे आदी साहित्यरसिकांनाही महत्वाच्या सत्रात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण दिले आहे. एकूणच साहित्यिकांसह शिक्षक, वाचक, लोककलाकार, विचारवंत अशा सर्वांना एकत्र घेऊन संमेलनाचे नियोजन केले जात आहे. संमेलन हे साहित्यिक आणि वाचक यांच्यातील सेतुबंधन आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.

Post a Comment