विकास चोभे -
अहिल्यानगरच्या मातीतून उभा राहिलेला, सर्वसामान्यांचा आवाज बनलेला, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा खरा लोकसेवक... स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंतच आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या विश्वासावर उभारलेले त्यांचे नेतृत्व आजही जनतेच्या मनात घर करून आहे. तीस वर्षे अविरत सुरू राहिलेला जनता दरबार, कार्यकर्त्यांवरचा अपार विश्वास, आणि प्रत्येक निर्णयात लोकहिताला दिलेले प्राधान्य—या सर्वांनी कर्डिले साहेबांना लोकनेता, बॉस, राजकारणातील महामेरू, साहेब, सर्वसामान्यांचा नेता ही ओळख दिली. त्यांचा साधेपणा, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेली नाळ हीच त्यांची खरी संपत्ती होती. साहेबांच अकस्मात जाणं म्हणजे नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला आलेली अपूरणीय पोकळी आहे.
मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात गेली तीन दशके अढळ स्थान निर्माण करून जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनाने एका विकासयुगाचा अंत झाला आहे.त्यांनी आयुष्यभर कमावलेली माणसे हीच त्यांची खरी संपत्ती होती.
जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारा, लोकसेवेला जीवन अर्पण करणारा नेता कायमचा दूर गेला… आणि सर्वत्र निशब्दता पसरली. आजही साहेब आपल्यात नाहीत यावर विश्वासचं बसत नाही. 30-35 वर्ष जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा लोकनेता होणे नाही...
साहेबांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुटुंबासाठी वेळ देता आला नसेल, पण मतदारसंघातील नगर तालुक्यातील प्रत्येक कुटुंब त्यांच्या आयुष्याचा भाग होतं. काम घेऊन येणाऱ्याला शिफारस लागत नव्हती, वारंवार फेऱ्या माराव्या लागत नव्हत्या. रात्र कितीही उशिराची असो, सकाळचा जनता दरबार वेळेवर सुरू व्हायचाच. गावातील, समाजातील, नात्यातील वाद मिटवायचे, लोकांना एकत्र आणायचे, गोवोगावच्या विकास कामांचे नियोजन करायचे, विकास साध्य करायचा हाती घेतलेले प्रश्न तडीस न्यायचे यातच कर्डीले साहेबांना मोठे समाधान मिळायचे.
"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल" — अशी लोकांमध्ये त्यांची ओळख झाली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश हवे असोत, एसटीच्या वेळा बदलाव्या असोत, शासन दरबारी प्रश्न प्रलंबित असोत — कर्डिले साहेबांचा एक फोन म्हणजे तो प्रश्न सोडविलाच जायचा!
प्रशासनावर त्यांची पकड विलक्षण होती. नगर - राहुरी- पाथर्डी मतदारसंघ साहेबांनी एक कुटुंब म्हणून सांभाळला. लग्नसराई असो, गावातील सण असो — साहेबांची उपस्थिती जनतेला हवीच असायची. दिवस-रात्र धावपळ करून लोकांमध्ये वावरायचे. बाहेरील जिल्ह्यांतील लोक देखील म्हणायचे — “तुमचं भाग्य की तुमच्याकडे शिवाजीराव कर्डिले साहेब आहेत.
एखादं नेतृत्व निर्माण व्हायला आयुष्य जातं, पण ते डोळ्यासमोरून गेलं की पोकळी कधीही भरून येत नाही. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आपलंसं वाटणारा हा नेता. त्यांच्या विकासकामांमुळे, लोकसेवेमुळे आणि साधेपणामुळे ते कायम जनतेच्या हृदयात जिवंत राहतील.
त्यांचा समाजकार्याचा वसा अक्षयदादा कर्डिले पुढे चालवतील, पण जनतेने त्यांच्याभोवती त्याच विश्वासाने उभं राहणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
असा जनसेवेसाठी वाहून घेतलेला नेता होणे नाही
राजकारणात असा कोहिनूर हिरा पुन्हा सापडणं कठीण आहे. कर्डीले साहेबांचा दुधावाला सरपंच ते आमदार अन मंत्री असा संघर्षमय प्रवास अविस्मरणीय आहे. मी एक साहेबांचा सामान्य कार्यकर्ता, 2010 पासून साहेबांसोबत, साहेबांनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. साहेबांनी कुटुंबातील सदस्या प्रमाणे आम्हाला प्रेम दिले. साहेबांचा विश्वासू असल्यामुळे चं राज्यात अग्रेसर असलेल्या नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीत १0 वर्ष संचालक म्हणून आणि उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली — हे माझ्यासाठी आयुष्यभराचं भाग्य आहे. माझ्या गावच्यावतीने, कुटुंबाच्यावतीने, विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने साहेबांना
भावपूर्ण श्रद्धांजली…
रेवणनाथ चोभे
मा. उपसभापती, नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर



Post a Comment