बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांची माहिती
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेची सन २०२४-२५ सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता स्टेशनरोड येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पार पडणार आहे. या सभेला विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
जिल्हा बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात आघाडी घेतली असून बँकेच्या २८७ शाखा व ११ विस्तार कक्षांचे कोअर बँकिंग प्रणालीद्वारे संगणकीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील ग्राहकांना एनी ब्रँच बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, आधारवेस पेमेंट, डीबीटी, एटीएम, पॉस, ई-कॉमर्स सेवा, एसएमएस अलर्ट, मोबाईल बँकिंग, गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी रुपे डेबिट कार्ड व रुपे किसान क्रेडिट कार्ड हेसुद्धा सुरू करण्यात आले आहे.
वार्षिक सभेच्या औचित्याने जिल्हा बँकेच्या क्युआर कोड सेवेस शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, मान्यवर, सभासद संस्था प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

Post a Comment