माय नगर वेब टीम
Shocking : बस स्टँडवर एका ३२ वर्षीय महिलेची तिच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली. ही महिला तिच्या १३ वर्षीय मुलीसह बस स्टँडवर असताना ही भयानक घटना घडली. अल्पवयीन मुलगी ही या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे. मृत महिला आणि आरोपी यांचे ३ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते. ही महिला कॉल सेंटरमध्ये काम करत असे, तर आरोपी हा कॅब ड्रायव्हर आहे. ही भयावह घटना बंगळुरूच्या सुनकडकट्टे बस स्टँडवर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रेखा आणि आरोपीचे नाव लोहितश्व असे आहे. दीड वर्षांपूर्वी दोघे मित्रांमुळे एकमेकांना भेटले, त्यांनी काही महिन्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर त्यांच्यात भांडण व्हायला सुरूवात झाली. या भांडणामुळेच रेखाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. रेखा आणि लोहितश्व भाड्याच्या घरात राहत होते. पहिल्या लग्नापासून रेखाला दोन मुली होत्या. तिची मोठी मुलगी तिच्यासोबत राहत होती.
नेमकं काय घडलं?
रेखा आणि लोहितश्वा यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर ती रागारागात तिच्या १३ वर्षीय मुलीसह घराबाहेर पडली आणि बस स्टँडवर गेली. लोहितश्वा तिच्या मागे गेला. दोघांमध्ये बस स्टँडवर पुन्हा भांडण झाले. रेखाच्या मुलीने भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात लोहितश्वाने चाकूने रेखाच्या छातीवर आणि पोटावर अनेक वार केले. हल्ल्यात रेखा बस स्टँडवरच मरण पावली.
रेखावर हल्ला होत असताना आसपासच्या लोकांनी लोहितश्वाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चाकूचा धाक दाखवत त्या लोकांना धमकावले. त्यानंतर तो बस स्टँडवरुन पळून गेला. रेखाच्या मुलीने संपूर्ण घटना पाहिली. जवळच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहितश्वा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment