माय नगर वेब टीम
राहुरी : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करताना राहुरी पोलिसांनी खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे. दवणगाव (ता. राहुरी) येथील बजरंग कारभारी साळुंखे (३९) व त्याची पत्नी शितल बजरंग साळुंखे (४०) या दांपत्याने अल्पवयीन मुलींचा लैंगिक शोषण केल्याबरोबरच एका तरुणाचा गळा दाबून खून करून मृतदेह घरामागे पुरल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.
१७ सप्टेंबर रोजी स्नेहालय संस्थेच्या स्वयंसेविका पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दांपत्याला अटक केली होती. चौकशीत त्यांनी अल्पवयीन मुलींचे विवाह पैशासाठी लावून दिल्याचेही मान्य केले. एका १४ वर्षीय मुलीचे लग्न पन्नास वर्षीय व्यक्तीशी एक लाख रुपयांत लावून देणे, तसेच दुसऱ्या १६ वर्षीय मुलीचे लग्न तीन लाख रुपयांत लावून देणे असे प्रकार समोर आले आहेत.
कसून चौकशीदरम्यान आरोपी बजरंग साळुंखे याने मार्च २०२५ मध्ये राहता येथील निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (३२) याचा गळा दाबून खून करून पत्नीच्या मदतीने मृतदेह घरामागे पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी कार्यवाही करत देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोदकाम केले असता मृतदेह सापडला. मृत गाडेकर हा साळुंखे दांपत्यासोबतच राहत असल्याने त्याच्या हरवल्याची तक्रार कुठेही नोंदवली नव्हती.
मृतदेहाचे पंचनामा करून प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पोस्टमार्टम करण्यात आले. त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायतीच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत उपनिरीक्षक राजू जाधव यांच्यासह राहुरी पोलिसांचे पथक सहभागी झाले.

Post a Comment