कापुरवाडीतील वृद्ध महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद



2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल हस्तगत – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर – कापुरवाडी येथे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला तोंड दाबून व बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत 2 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एक आरोपी फरार आहे.

दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सौ. सरस्वती शिवाजी दुसुंगे (रा. दुसुंगेमळा, पिंपळगाव उज्जैनी रोड, कापुरवाडी) मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता, तिन्ही अज्ञात आरोपींनी त्यांचे तोंड दाबून व अग्निशस्त्राचा धाक दाखवत गळ्यातील व कानातील 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे दागिने चोरले होते. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या गांभीर्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाच्या सूचना दिल्या. पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

या कारवाईत पथकाने कुकाणा येथे सापळा रचून विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 24, रा. जेऊर हैबती, कुकाणा) व सुदाम विक्रम जाधव (वय 29, रा. सुलतानपुर, नेवासा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा गुन्हा साथीदार फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा – सध्या फरार) याच्यासह केला असल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 35 हजारांचे सोन्याचे दागिने व 70 हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल असा एकूण 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध जबरी चोरी व आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे करत आहे.

आरोपी तुपे याच्याविरुद्ध यापूर्वी नेवासा व तोफखाना पोलीस ठाण्यात दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे नोंद आहेत, तर आरोपी जाधव याच्याविरुद्ध पाथर्डी ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post