शासकीय विभागांनी समन्वय ठेवत अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील



पालकमंत्री सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर; पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर – भारतीय हवामान विभागाने २८ व २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंधारण, जलसंपदा, बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग यांसह सर्व आपत्तीशी संबंधित विभागांनी एकमेकांत समन्वय ठेवून अतिवृष्टीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.

अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीक, शेतजमीन तसेच इतर नुकसानीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे आदी उपस्थित होते.






मागील ६० वर्षांत न झालेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे नुकसान झाले, बंधारे फुटले, पुलांची पडझड झाली. पाण्याच्या दबावामुळे जुने पाझर तलाव गळतीस लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पूलाच्या बाजू खचल्या आहेत.

अतिवृष्टीने बाधित सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे थेट प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य नाही, अशा ठिकाणच्या क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जमिनीचे पुनर्भरण करण्यासाठी शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये. या आपत्तीला धीराने सामोरे जावे. येत्या दहा दिवसांत सर्व अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांचे पीक पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. विखे पाटील यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव, पाथर्डी, मोहटा, कारेगाव, करंजी व परिसर, तसेच शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव व परिसरातील गावांची पालकमंत्र्यांनी गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरापर्यंत पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत पालकमंत्र्यांनी त्यांना धीर दिला.

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित

विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावीत

दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे 

मुंबई : बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. 

26 तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपार नंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो. 

26 तारखेच्या तुलनेत 27 आणि 28 ला राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते, ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच बरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, जसं की सोलापूर, इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचे संकेत आहे. या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.  

28 तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) पाऊस अपेक्षित आहे, ज्यातील काही भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहे. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो. 

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post