माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : “स्वार्थासाठी पदावर येण्याआधी यात्रा काढायच्या, पण पद मिळाल्यावर त्या बंद करायच्या – हा स्वार्थाचा खेळ सर्वांना ठाऊक आहे. मात्र माझा कार्यकर्ता योगेश सोनवणे पाटील याने कोणतेही पद नसताना सलग अकराव्या वर्षी माता-भगिनींना मोफत मोहटा देवीचे दर्शन घडवले, ही खरोखर अभिमानाची बाब आहे!” अशा शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार वार केला.
सावेडीतील टीव्ही सेंटर येथे विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने मोफत मोहटा देवी दर्शन यात्रेचा शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी बोलताना राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या भावना वापरणाऱ्यांना चपराक लगावली.
विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे पाटील हे कोणतेही पद नसतानाही सलग 11 वर्षांपासून या यात्रेचे आयोजन करत आहेत. त्यांच्या या सातत्याचे कौतुक करताना सुजय विखेंनी “कार्यकर्ता असं असावा. पदावर असतानाच नव्हे तर पद नसतानाही समाजकार्य सुरू ठेवणं, हेच खरं नेतृत्व आहे” असे सांगत लंके यांच्या बंद पडलेल्या यात्रेवर टोलाही लगावला.
यावेळी मोठ्या संख्येने महिला, कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. रोज माता-भगिनींना दर्शन घडवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत असून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Post a Comment