सरकार अगोदर पोहचली खा. लंके यांची मदत! ; आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :   अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीने पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उध्वस्त चित्र पहावयास मिळाले. पावसाचा जोर थांबताच खा. नीलेश लंके यांनी आपत्तीग्रस्त गावांकडे धाव घेत प्रत्येक वस्तीस भेट देत आढावा घेतला. स्थानिकांना धीर देत त्यांच्या गरजा समजावून घेतल्या. त्यांना आवष्यक किराणा किटचे वितरण करत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखीत केली आणि पुन्हा एकदा आपत्तीसमयी त्यांच्या लोकनेतेपणाचा प्रत्यय आला. 

      मुसळधार पावसामुळे करंजी, सातवड, देवराई, घाटशिरस, तिसगांव, पाडोळे वस्ती, शिरसाटवाडी, रांजणी, कारेगांव, त्रिभुवनवाडी व पाथर्डी शहरात मोठे नुकसान झाले आहे. करंजी गावामध्ये २५ ते ३० घरांमध्ये पाणी शिरले.      

         पाहणीदरम्यान खा. लंके यांच्यासमवेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई कराळे, रफिक शेख, अशोक अकोलकर, राजेंद्र पाठक, सुभाष अकोलकर, गणेश अकोलकर, सुनील अकोलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.  


     अनेक गावांमध्ये वीज खंडित झाली होती. खा. लंके यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपत्कालीन पथके तैनात करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या.पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामपंचायतशी संपर्क करून समन्वय साधला. पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांवर वाहतूकीची तात्पुरती व्यवस्था करण्यासंदर्भात जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना देण्यात आल्या. 


     शेतांमधील बहुतांश पिकांचे या ढगफुटीमुळे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. खा. नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजावून घेतल्या. त्यांना धीर देत सरकारने तात्काळ मदतीचे विशेष पॅकेज तसेच सरसकट पंचनामे करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 


     बुधवारीही खा. लंके हे आपत्तीग्रस्तांच्या भेटीसाठी आपत्तीग्रस्त भागात होते. पुनर्वसन, भरपाई, वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुर्तता होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. आपत्ती आणखी मोठ्या संकटात बदलू नये यासाठी प्रशासनाला सज्ज करून स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरत दिलासा देणारा हा प्रयत्न जिल्ह्यात आदर्श ठरल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे. 


पूर्वीच्या अनुभवाचा फायदा 

मे महिन्यात वाळकी व परिसरातील पूरपरिस्थितीत खा. लंके यांनी धावून जात रस्ते तयार करणे तसेच गरजूंना किरणा किट, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला होता. त्या अनुभवाचा वापर करून यावेळीही बचाव, पुनर्वसन व मदत यंत्रणा अधिक वेगाने कार्यरत करण्यात यश मिळवले. 


आपत्तीग्रस्तांच्या भावना 

सरकारची मदत कधी येईल हे ठाऊक नाही, पण खासदार नीलेश लंके यांनी आमच्यासाठी किराणा किट उपलब्ध करून दिले. सकाळपासून ते आमच्यासोबत आहेत. धीराची पहिली उभारी त्यांनीच दिली. आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधीचे दाखवायची जबाबदारी खा. लंके यांनी प्रत्यक्ष कार्यातून सिध्द केली. सरकारची मदत थांबून राहिलेली असली तरी लोकनेता थेट गावात पोहोचतो, हीच खरी ताकद असल्याच्या भावना पुरग्रस्तांनी व्यक्त केल्या. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post