अतिवृष्टीग्रस्त भागाची खा. लंके, मा. मंत्री तनपुरे यांनी केली पाहणी
खा. लंके यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना किराणा किटचे वाटप
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : लोकांनी आयुष्यभराच्या कष्टाने उभे केलेले संसार एका रात्रीत उध्वस्त झाले आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झाली तरी लोकांना आता मदतीची गरज आहे. कागदी अहवाल तयार होईपर्यंत लोक उपाशी राहणार का ? शासनाने तात्काळ आर्थिक मदत व साहित्याची मदत करावी. वाळकी परिसरातील पूवच्या आपत्तीप्रमाणे फक्त नोंदी करून काम संपवू नका असे सुनावत खा. नीलेश लंके यांनी आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीची आवष्यकता असल्याचे ठामपणे सांगितले.
तिसगांव परिसरात दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने कहर केला. परतीच्या या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. रस्ते वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहात घरे पाण्यात वाहून गेली. शेतजमीनीवरील पिके संपूर्णपणे नष्ट झाली. आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्यासाठी खा. नीलेश लंके यांनी मंगळवारी सकाळीच तिसगांव तसेच इतर आपत्तीग्रस्त भागाकडे मा. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह धाव घेतली. आपत्तीग्रस्त कुटूंबांची घरे, शेतजमिनी, वाहून गेलेले रस्ते यांची पाहणी त्यांनी करत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिक उध्वस्त झाले आहेत. लोकांनी पन्नास, पन्नास वर्षे कष्टाने उभे केलेले एका रात्रीत उध्वस्त झाले. नुकसानीने पंचनामे झालेच पाहिजेत कारण त्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. पंचनामे झाल्यानंतर बाधितांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. पंचनामे होतील मात्र सध्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचे अपेक्षा असून प्रशासनाने त्यांनी ती करावी अशी आमची मागणी आहे.
मदतीचा हात देण्याची आमची भूमिका
आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करताना, आपत्तीग्रस्तांशी संवाद साधताना आपण त्यांना काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे अशी आमची नेहमीच भूमिका असते. त्याप्रमाणे या भागातही आम्ही आपत्तीग्रस्तांच्या भेटीप्रसंगी किरणा किटचे वाटप करत आहोत. असे खा. नीलेश लंके यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निकष दूर ठेऊन मदत द्या
इतक्या मोठया प्रमाणावर अतिवृष्टी या भागात आजवर कधी झाली नव्हती. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणारी मदत ही तुटपुंजी असते. येथे लोकांचा संपूर्ण प्रपंच कोसळला आहे. शासनाने हे निकष बाजूला ठेऊन विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. घरे, रस्ते, पिके सर्वकाही नष्ट झाले आहे. फक्त पिक विमा किंवा सापेक्ष मदत अपुरी ठरेल. नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जातो आणि पुरस्थिती गंभीर बनते त्यासाठी अतिक्रमणेही हटविणे गरजेचे आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
वीजेचा धक्का बसलेल्या महिलेस मदत
वीजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून तिसगांव परिसरातील कोठ भागात बुखरा सिकंदर शेख ही महिला गंभीर जखमी झाली. त्यावेळी खा. लंके व मा. मंत्री तनपुरे हे आपत्तीग्रस्तांच्या गाठीभेटी घेत होते. या घटनेची माहीती समजल्यानंतर लंके व तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांना स्वतःच्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले.
Post a Comment