माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : मागील २४ तासांत तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाल्याने शहर व परिसरात सीना नदीला पूर आला आहे. परिणामी नालेगाव, दातारंगे मळा, सताळकर मळा यांसह अनेक भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. ते पाण्यात उतरून नागरिकांपर्यंत पोहोचले, त्यांच्या हालअपेष्टा जाणून घेतल्या व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू व आपत्ती व्यवस्थापन पथके पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच महा वितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून, पाण्यात करंट जाण्याचा धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा सुरक्षित करण्याचे आदेश दिले.
पाहणीदरम्यान नगरसेवक योगिराज गाडे, विक्रम राठोड, दिलदारसिंग बिर, गिरीश जाधव, मंदार मुले, राकेश बोगवट, प्रथमेेश महिंदरकर, ओम काले, शुभम मिरांडे, महेश शेलके, अक्षय नागपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांना दिलासा आणि आवाहन
खासदार लंके यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्याचा सल्ला दिला.
मदत जाहीर करण्याची मागणी
पूरामुळे शेती, घरे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली.
हेलिकॉप्टरची मदत
देवटाकळी तालुका शेवगाव येथे रविवारी सकाळी पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार लंके यांच्याकडून लष्कर प्रशासनाशी संपर्क करून हेलिकॉप्टर ने मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर लष्कर प्रशासनाने तत्काळ हेलिकॉप्टर पाठवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
Post a Comment