आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा सज्ज; आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून साधला नागरिकांशी संवाद
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून, नदीलगतच्या परिसरात नागरी वसाहती, घरांमध्ये पाणी शिरले आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने नेप्ती नाका, कल्याण रोड परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बोटीच्या सहाय्याने सुमारे ३५ ते ४० नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
आमदार संग्राम जगताप, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील परिस्थितीची पाहणी केली. स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्यासमवेत गोरे वस्ती, डॉन बॉस्को, ठाणगे मळा, दातरंगे मळा, नेप्ती नाका व सावेडी परिसराची पाहणी केली. तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. तसेच महापालिका प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी दिले. प्रभाग क्रमांक ८ मधील गोरे वस्ती, गणेश चौक, पितळे कॉलनी व संभाजीनगर भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर घरात शिरले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी आंबेडकर चौक ते सीना नदीपर्यंत 900 एमएम व्यासाची गटार योजना लवकरच मार्गी लागेल, असेही आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी मी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कामालादेखील सुरुवात झाली होती. मात्र काही धनदांडग्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळवली. आजच्या परिस्थितीत महापालिकेने पूरस्थितीची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करून नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले की, बाळाजी बुआ विहिरीमागे ठाणगे मळा, कवडे नगरजवळ पुराच्या पाण्याने घरात अडकलेले नागरिक, तसेच महानगरपालिका संपवेल येथील कामावरील कर्मचारी, लहान मुली, वयोवृद्ध व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरले असून या भागात सक्शन मशीन, गाड्यांद्वारे पाणी काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश चौक, बोल्हेगाव, केडगाव परिसर, रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणीही महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून उपाययोजना सुरू आहेत.
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. नागरिकांनी मदतीसाठी महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षात विभाग प्रमुख शंकर मिसाळ मोबाईल नंबर 9561004637 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच, 9175675232 या क्रमांकावर व्हॉट्स ॲपद्वारे फोटो, व्हिडिओ अथवा लिखित स्वरूपात आपली समस्या पाठवा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
Post a Comment