नगरमध्ये पतसंस्थेच्या चेअरमनची आत्महत्या, पतसंस्थांमध्ये खळबळ, कारण आले समोर...

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - आर्थिक दिवाळखोरी मुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६३, रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.


शेवाळे यांनी दि.३१ मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी (दि. ३) रात्री ८.४९ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मयत शेवाळे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी (दि. ४) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.

मयत शेवाळे यांनी वडगाव गुप्ता गावात श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली होती. अल्प कालावधीतच या पतसंस्थेचा विस्तार होत नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये शाखा सुरु झाल्या होत्या. मात्र काही कालावधीनंतर ही संस्था आर्थिक डबघाईला गेली आणि एक एक करत सर्व शाखा बंद पडल्या. पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर शेवाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता.


शेवाळे यांना पोलिसांनी अटकही केली. ते अनेक दिवस कारागृहात होते. गेले काही दिवस ते जामिनावर सुटलेले होते. घरी असताना दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले. रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (दि. ३) रात्री ८.४९ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post