माय अहमदनगर वेब टीम
राहुरी - गेली पन्नास, साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात. या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे. त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत. पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही. त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले. असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.
स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे. विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी केला.
राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे. तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील. खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.
नादी लावणारांना घरी पाठविण्याची वेळ
पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.
रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल
नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील.
आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही !
पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.
Post a Comment