अबब! बाजार समितीत दोन कोटींचा कांदा घोटाळा, कसा झाला घोटाळा पहा...



माय अहमदनगर वेब टीम 

श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोगस काटा पट्टी पावत्या तयार करत ३०२ शेतकऱ्यांच्या नावे बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करून १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा गैरव्यवहार करत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत बोगस काटा पट्टी पावत्या तयार करणारे व्यापारी, संस्थेचे सचिव दिलीप डेवरे तसेच डेबरे यांच्या सुचनेनुसार यात सहभागी असलेल्या इतर सर्व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पूरी यांनी दिले आहेत.


श्रीगोंद बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी सन २०२२-२०२३ मध्ये कांदा अनुदान योजनेत बोगस प्रस्ताव दाखल करत अनुदान लाटल्याची तक्रार टिळक भोस यांनी केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले.


यामध्ये अनुदानासाठी ४९५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव बोगस असल्याची केलेली तक्रार व त्यानुसार ४९५ शेतकऱ्यांच्या प्रस्ताव तपासणीत व कांदा खरेदी-विक्री तसेच कांद्याची दैनिक आवक व व्यापाऱ्यांनी विक्रीनंतर बाहेर पाठविलेल्या कांद्याची जावक, यामधील व्यापाऱ्यांची कांदा विक्री यामधील तफावती विचारात घेता ४९५ पैकी ३०२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव हे अपात्र व बोगस असल्याचे तपासणीत आढळून आले.


याबाबत सभापतींना दिलेल्या पत्रात पुरी यांनी म्हटले आहे की, सचिव दिलीप डेबरे यांनी दैनंदिन कांदा आवक-जावक संदर्भात चुकीची माहिती कळवली आहे. फेब्रुवारी व मार्च २०२३ मधील कांदा खरेदीच्या मापाडी खतावणीमधील नोंदी आणि अनुदानासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये ३५ हजार क्विंटलची तफावत आढळून आली आहे.


संस्थेचे सचिव दिलीप डेबरे यांनी अनुदानाचे प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्व पडताळणी न करता ते प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करण्यासाठी तयार केलेल्या बोगस कांदा पट्टया तयार करण्यात सचिव दिलीप डेबरे व संबंधित कर्मचारी वैयक्तिक व सामूहिकरित्या जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


याप्रकरणी पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post