भाजपच्या जाहिरातबाजीसाठी सर्वसामान्य नगरकरांवर कारवाई करू नये, काँग्रेसची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : बाजारपेठेतील रस्त्याचे काम सुरू असताना बॅरीकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स उलटा लावण्यात आला होता. त्यावरून बुधवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना समोर येताच तात्काळ तो फ्लेक्स हटविण्यात आला. मात्र यावरून काँग्रेसने आक्रमक होत फ्लेक्स लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. प्रभू श्रीरामांचा अवमान काँग्रेस कदापि खपवून घेणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
काळे म्हणाले की, त्या फ्लेक्सवर देशाचे पंतप्रधान, भाजपचे खासदारकीचे उमेदवार यांच्यासह भाजप नेत्यांचे देखील फोटो आहेत. तो फलक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने लावला होता. मुळात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना आधीच तो फ्लेक्स भाजपने काढून घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच त्या ठिकाणी काम करणाऱ्या रस्त्याच्या ठेकेदाराने देखील चुकीचे कृत्य केले आहे. प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंसाठी आस्थेचा विषय आहेत. अशा पद्धतीने जर त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणार असेल तर काँग्रेस ती कदापी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आचारसंहिता कक्षाने यावरती संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे काळे म्हणाले.
काळे पुढे म्हणाले, केवळ निवडणुका आल्या की प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचे. त्यांच्या नावाने साखर वाटायची. दिवाळी साजरी करतो म्हणायचे. निवडणुकां पुरते प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने त्यांचा अवमान होईल असं कृत्य करायचं. भाजपला प्रभू श्रीराम हे केवळ राजकारणा पुरते हवे आहेत. त्यांना त्यांच्याबद्दल मनापासून आस्था नाही. हे अनेक वेळा उघड झाले आहे. यापूर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नगर शहरामध्ये आले असता जय श्रीरामची घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी ती थांबवून नरेंद्र मोदींचा जयजयकार करण्याचा प्रताप केला होता. त्याही वेळेला काँग्रेसने त्याचा निषेध केला होता.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी माझ्याकडून पाच वर्षात काही चुकले असेल तर माफी मागतो असे म्हणत माफीनामा सादर केला होता. ज्यांना माफीवीर व्हायचं आहे त्यांनी जरूर व्हावे. प्रभू श्रीरामांचा अवमान भारतीय जनता पार्टी कडून शहरामध्ये झाला आहे. त्याबद्दल सुद्धा भाजपचे उमेदवार तमाम हिंदू धर्मियांची माफी मागणार काय ? असा संतप्त सवाल करत भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी केले आहे.
ती कारवाई भाजपवर करावी :
हर घर मोदी, घर घर मोदी असे घोषवाक्य लिहीत भाजपचे निवडणूक चिन्ह असणारे कमळ शहरातल्या सरकारी तसेच अनेक खाजगी मालकांच्या भिंतींवर रेखाटण्यात आले आहे. त्या संदर्भात नागरिकांनी आचारसंहिता कक्षाकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने संबंधित घरांच्या घर मालकांना तंबी दिली आहे. घर मालकांनी स्वतःहून सदर भिंती स्वच्छ कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून किरण काळे म्हणाले की, यात त्या खाजगी मालकांचा काय दोष ? रात्रीच्या अंधारात शहरातील लोकं झोपेत असताना त्यांच्या घरांच्या भिंती रंगवण्याचे काम भाजपने केले आहे. यांना आदर्श आचारसंहिता मान्य नाही. मात्र भाजपच्या चुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाने वेठीस धरू नये. कारवाई जरूर करावी. मात्र ती भाजपवर करावी. सर्वसामान्य नगरकरांना जर यात प्रशासनाने विनाकारण त्रास दिला, त्यांची पिळवणूक केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा जाहीर इशारा किरण काळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
Post a Comment