माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - दुकानातील कामगाराला मारहाण करून बांधून ठेवत 17 एलईडी, पितळ्याचे भांडे असा एक लाख 55 हजाराचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी (दि. 19) पहाटे एक ते चार वाजेच्या दरम्यान नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील धनगरवाडी (ता. नगर) शिवारातील टोलनाक्याजवळ शुभम ट्रेडर्समध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी दुकानाचे मालक सोपान भीकाजी शीकारे (रा. जेऊर ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीकारे यांचे टोलनाक्याजवळ शुभम ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी पहाटे चार चोरट्यांनी दुकानाचे राखण करणारा कामगार बाबुलाल सुखू राजभर यांना शिवीगाळ, मारहाण करून पार्किंगच्या पट्ट्याने बांधून ठेेवले. दुकानाच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर उचकाटून आत प्रवेश केला. 32 इंचीचे 15 एलईडी, 43 इंचीचे दोन एलईडी, तांबे पितळ्याचे भांडे असा एक लाख 55 हजाराचा ऐवज लंपास केला. सदरचा प्रकार पहाटे चार वाजता एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार चोरटे असल्याची खबर पोलिसांना मिळाली आहे. शीकारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत.
Post a Comment