आधी आम्हाला जिवंत गाडा, मगच काम करा



 नगर औरंगाबाद महामार्गावरील परिस्थिती...

 गॅस पाईपलाईनमुळे अतोनात नुकसान ; शेतकरी कुटुंबीयांची आक्रमक भूमिका

माय नगर वेब टीम 

 नगर तालुका- नगर औरंगाबाद महामार्गालगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी जेऊर येथील निलेश गोरे कुटुंबीयांनी आधी आम्हाला खड्ड्यात गाडा मगच काम करा अशी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले आहे. शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी हा प्रकार घडला.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद महामार्गालगत गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. सदर पाईपलाईनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दखल घेण्यात येत नाही. काम अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

     संबंधित काम करताना ठेकेदाराची मनमानी सुरू असून शेतकरी, व्यावसायिक यांचे नुकसान करण्यात आले आहे. शेकडो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. मनमानी पद्धतीने एकेरी वाहतूक केल्याने अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. जेऊर परिसरात अनेक लहान पुल बंद करण्यात आल्याने पावसाचे पाणी उभ्या पिकात घुसले. पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आल्याने पिके व सुपीक जमीन वाहून गेली.

     व्यावसायिकांसमोर अनेक दिवस चर खोदून ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गालगत चर खोदल्यानंतर माती टाकण्यात आल्याने अनेक व्यवसायिकांसमोर गाळाचे साम्राज्य साचले होते. वाहने त्यामध्ये फसल्यामुळे वाहनधारकांचेही नुकसान होत होते. महामार्गालगत विद्युत महामंडळाचे पोल शिफ्ट करण्यात आले. त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.

      जेऊर परिसरात कामाला सुरुवात झाल्यापासून शेतकरी, व्यावसायिक संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कामाला विरोध करत होते. प्रशासनाकडे, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याकडे अर्ज, निवेदने देण्यात येत होते. परंतु शेतकरी तसेच व्यावसायिकांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस संबंधित ठेकेदाराची मनमानी वाढत गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.

     अनेक वेळेस आंदोलनाचा, आत्मदहनाचा इशारा देऊन देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाच्या सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांनी काम करताना कशाच्या आधारे संबंधित ठेकेदाराला परवानगी दिली. शेतकरी, व्यावसायिक यांच्या नुकसानीची परवानगी देण्यात आली आहे काय ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

    जेऊर येथील निलेश गोरे यांच्या शेतीचे नुकसान होत असल्याने गोरे यांचे कुटुंबीयांनी पाईपलाईनचे काम करणाऱ्या मशीन समोर बसून ठिया दिला. आम्हाला अगोदर गाडा मग तुमचे काम पूर्ण करा अशी भूमिका या शेतकरी कुटुंबांनी घेतली होती. निलेश छगन गोरे, द्वारकाबाई गोरे, छगन गोरे, गणेश गोरे, महेश गोरे, यांनी काम सुरू असलेल्या मशीन समोरच ठिय्या दिल्याने संबंधित ठेकेदाराने नाविलाजास्तव काम बंद केले आहे. जेऊर पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिक यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मोबदला मिळण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 शेतकऱ्यांना मोबदला मिळणे गरजेचे 

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाने चुप्पी साधली आहे. सर्व खात्याचे अधिकारी संबंधित कंपनी व ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही का ? गॅस पाईपलाईनचे काम नियमानुसार होत आहे का ? याची पाहणी प्रशासनाच्या वतीने करणे गरजेचे आहे.

..... निलेश गोरे ( शेतकरी )

____________

 जेऊर पंचक्रोशीत सुमारे सहा महिन्यांपासून संबंधित कंपनी विरोधात शेतकरी, व्यावसायिक तक्रार करत आहेत. ठेकेदाराच्या मनमानी विरोधात आंदोलने, आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. पंचक्रोशीतील सरपंचांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते. परंतु संबंधित कंपनी व ठेकेदारा विरोधात मनमानी काम सुरू असून देखील प्रशासन कारवाई का करत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post