दिनेश बेल्हेकर यांची जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी प्रतिक्षा आरक्षणाची ; जेऊर गटात दांडगा जनसंपर्क

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या जेऊर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची पूर्णता तयारी केली आहे. परंतु १३ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले असून बेल्हेकर यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

     दिनेश बेल्हेकर यांच्या घराण्याचे राजकारण, समाजकारण, धार्मिक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान राहिलेले आहे. स्वर्गीय आजोबा रामनाथ बेल्हेकर यांचा समाजसेवेत तसेच जेऊरगावच्या राजकारणात सक्रिय सहभाग राहत असे. स्वर्गीय रामनाथ बेल्हेकर यांचा नगर तालुक्यातील राजकारणात दबदबा होता. त्यांना मानणारा आजही जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग जेऊर गटामध्ये राजकारणात सक्रिय आहे.

      दिनेश बेल्हेकर यांचे वडील बबन बेल्हेकर हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याचा देखील फायदा निश्चितच दिनेश बेल्हेकर यांना होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. बेल्हेकर कुटुंब हे कांद्याच्या व्यापारामुळे पंचक्रोशीत नावाजलेले घराणे आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांचे घरगुती संबंध बनलेले आहेत. कांद्याच्या व्यापारामुळे दिनेश बेल्हेकर प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचलेले आहेत.

       जेऊर गटामध्ये दांडगा जनसंपर्क असून तरुणांची मोठी फळी बेल्हेकर यांच्या पाठीशी उभी आहे. जेऊर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात असलेला मित्रपरिवार, नातेसंबंध, कांद्याच्या व्यापारामुळे शेतकऱ्यांशी जुळलेले घनिष्ठ नाते, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मदत करणारे दिनेश बेल्हेकर यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण चांगले आहे. ग्रामपंचायत च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे.

      कोरोनाच्या काळात दिनेश बेल्हेकर यांनी गोरगरीब जनतेला मोफत किराणा वाटप केले होते. तसेच दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करून समाजाप्रती असलेली तळमळ दाखवून दिली होती. कोरोनाच्या काळात उत्तम आरोग्य सेवा बजावणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा पाहून दिनेश बेल्हेकर यांनी जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

     जेऊर पंचक्रोशीतून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी आर्थिक मदत बेल्हेकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आलेली आहे. जेऊर जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणी बेल्हेकर यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. दिनेश बेलेकर यांचे कार्य पाहून त्यांनी जेऊर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी असा आग्रह  जेऊर गटातील विविध गावातील तरुण कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींकडून त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वासही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

     दिनेश बेल्हेकर यांनीही गेल्या सहा महिन्यांपासून जेऊर गट पिंजून काढलेला आहे. वैयक्तिक भेटीगाठी, गावातील अडचणी, तरुणांशी चर्चा, शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेत आहेत. बेल्हेकर यांनी संपूर्ण तयारी केली असली तरी जेऊर जिल्हा परिषद गटात पडणाऱ्या आरक्षणावर त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे.

--------------------------------------------------------------------------------------

दिनेश बेल्हेकर यांच्या निर्णयाकडे विरोधकांचे लक्ष

दिनेश बेल्हेकर यांनी निवडणुकीची पूर्णता तयारी केली असली तरी त्यांची उमेदवारी ही आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. दिनेश बेल्हेकर यांची उमेदवारी गृहीत धरून विरोधकांकडून देखील तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------------------------------------------------------------------

सामाजिक कार्यात आगळावेगळा ठसा

 बेल्हेकर कुटुंबीयांचा जेऊर पंचक्रोशीत सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो. गावातील धार्मिक, शैक्षणिक, गोरगरीब, गरजूंसाठी नेहमीच मदत करणारे बेल्हेकर कुटुंबीय जेऊर पंचक्रोशीत चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे. दिनेश बेल्हेकर यांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे विरोधकांनी देखील दखल घेतल्याचे चित्र जेऊर गटात दिसून येत आहे.

----------------------------------------------------------------------------

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post