माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावाला अनेक वर्षापासून भेडसावत असणा-या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांनी निंबळक गावासाठी वाढीव पाण्याचा कोटा देण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी दिली.
निंबळक गाव हे नगर शहरालगत तसेच औद्योगिक वसाहतीत येत असल्याने येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती. सद्यस्थितीत निंबळक गावासाठी पाच लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. गावची लोकसंख्या व औद्योगिक वसाहतीमुळे बाहेरील मजुरांची वाढती संख्या यामुळे गावाला पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
निंबळक गावाला पाण्याचा वाढीव कोटा मिळवण्यासाठी सुमारे दोन वर्षापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू होता. मंत्रालयात तात्कालीन मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत या प्रश्नावर वारंवार बैठका व चर्चा झालेल्या आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निंबळक गावाला पाच लक्ष लिटर कोट्यावरून आता नऊ लक्ष लिटर पाण्याचा वाढीव कोटा मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे पुणे येथील कार्यकारी अभियंता यांनी याबाबत निंबळक ग्रामपंचायतीस पत्र दिले आहे. निंबळक ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच म्हणून सौ. प्रियंका अजय लामखडे या काम पाहत आहेत. एक महिला सरपंच असल्याने पाण्यासाठी महिला वर्गाला किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीव सरपंच सौ. लामखडे यांना होती.
महिला सरपंच असताना सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य यांनी केलेल्या सहकार्यामुळे निंबळक गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती सरपंच लामखडे यांनी दिली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने निंबळक गावच्या विकासाला गती मिळणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव कोटा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले आले.
---------------------------------------------------
निंबळक गावाला भेडसावणाऱ्या मुख्य पाण्याचा प्रश्न मार्गी लावायचाच हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्याने वाढीव कोटा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. पुणे, मुंबई, मंत्रालय येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून गावातील परिस्थितीची अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे भूमिका मांडली. वाढीव कोटा मिळवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटी सदस्य यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले. पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आता निंबळक गावच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
..... सौ. प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)
________________________________________
आमदार निलेश लंके यांचे बहुमोल सहकार्य
आमदार निलेश लंके यांनी निंबळक गावातील पाण्याची समस्या जवळून बघितली होती. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असल्याने त्यांनीही निंबळक गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना सांगून प्रत्यक्ष भेट घेऊन गावच्या परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. आमदार निलेश लंके यांनी केलेल्या सहकार्यामुळेच निंबळक गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप मोठी मदत झाल्याची भावना निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
______________________________________________
Post a Comment