राज्यसभेत दगाफटका ; शिवसेनेने घेतला 'हा' निर्णय, आता काँग्रेसला 'ताप'

 



अर्जुन राजापूरे / माय नगर 


राज्यसभा निवडणुकीत चांगलेच पोळल्याने शिवसेनेने विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत आघाडीचा धर्म बाजूला ठेवत ‘हात’ झटकले आहेत. ‘ज्याने त्याने आपले पाहावे’ असा निरोप शिवसेनेकडून गेल्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली आहे.


गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक होत असल्याने शिवसेनेच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असून काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांची उमेदवारी काँग्रेससाठी ‘ताप’दायक ठरू शकते.


आघाडीच्या या अंतर्गत साठमारीत छोटे पक्ष आणि अपक्षांच्या पाठबळावर भाजपचा ५ वा उमेदवार निवडून येण्याची अधिक शक्यता आहे. विधान परिषदेच्या १० जागांची निवडणूक सोमवार, २० जून रोजी होत आहे.यासाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात भाजपचे ५, तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ असे ६ उमेदवार आहेत. रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र ते निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे.

सोमवार, १३ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. विजयी उमेदवारास विधानसभा आमदारांची २७ मते आवश्यक आहेत. शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ व काँग्रेसचा एक व भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येतील. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारास १७ मते कमी पडतात. अपक्ष व छोट्या पक्षांच्या बळावर भाजपने ५ वा उमेदवार दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post