जेऊर परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय निसर्गभ्रमंती ग्रुप व वन विभागाचा पुढाकार

 माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील डोंगररांगांमध्ये वनविभागामार्फत तसेच निसर्गभ्रमंती ग्रुपच्या वतीने पाणवठ्यात वन्य प्राण्यांसाठी पाणी टाकण्यात आले आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर पंचक्रोशीतील बहिरवाडी, चापेवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा या गावातील डोंगररांगांनी वन विभागाच्या वतीने पाणवठे बनविण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत डोंगर रांगांमधील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी आतोनात हाल होत होते. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे धाव घेताना दिसून येत होते.

     जेऊर परिसरातील डोंगररांगांमध्ये हरिण, काळवीट, ससा, लांडगा, कोल्हा, खोकड, साळींदर, रानडुक्कर, मोर तसेच विविध जातीचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे देखील वास्तव्य आढळून आलेले आहे. उन्हाळ्यात त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार वनविभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून बहिरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा येथील पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

      यासाठी वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक श्रीराम जगताप, वनरक्षक मनेष जाधव, वनकर्मचारी संजय सरोदे, तुकाराम तवले, संजय पालवे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना निसर्ग भ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर,प्रसाद खटावकर, संजय दळवी,नितीन केदारी, ज्ञानेश्वर कातकडे, नितीन चिंचोरकर, सलमान आर्मेचरवाला, प्रमोद गुरव,शिरीष देवरे,रामभाऊ जगताप,विनय कुलथे,सागर कदम यांची मदत झाल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.


      जेऊर परिसरातील वन विभागाचे कार्य कौतुकास्पद असेच राहिलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परंतु बिबट्या दिसताच वन विभागाला माहिती मिळाल्याबरोबर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत होते. पिंजरा लावणे, जनजागृती करण्यात वनविभाग नेहमीच पुढाकार घेताना दिसून आला. तसेच परिसरात वन्य प्राणी जखमी आढळल्यास त्यावरही वनविभागामार्फत तात्काळ दखल घेऊन उपचार करण्यात आल्याचे दिसून आलेले आहे. 

       डोंगराला लागलेला वनवा विझवण्यासाठी रात्री-अपरात्री वन अधिकारी व कर्मचारी हजर होत असतात. वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी जंगलामध्ये गस्त घालणे, वृक्षतोड थांबवणे यासाठी जेऊर मंडळात वनविभाग दक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांचे जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post