नगर तालुक्यातील परिस्थिती.... डिझेल अभावी टँकर सुरू करण्यास अडचण ; प्रशासन हतबल तीव्र पाणीटंचाई ; जेऊर येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

 


माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- नगर तालुक्यातील सहा गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातील तीन गावांनी टँकरला मंजुरी मिळाली आहे. परंतु डिझेल अभावी गावात टॅंकर सुरू झाले नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, मदडगाव, बाळेवाडी, नारायण डोहो या सहा गावांनी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल आहेत. त्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर या गावातील टॅंकरला मंजुरी मिळालेली आहे. तर मदडगावचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे असून बाळेवाडी व नारायणडोहोचे प्रस्ताव अद्याप टपालातच आहेत. 

     बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावांनी टँकर मंजूर झाले परंतु टँकर डिझेल अभावी सुरू करण्यात आलेले नाहीत. पूर्वी ज्या पंपावरून डिझेल उधारीवर घेतले जायचे त्यांनी डिझेल देण्यास नकार दिल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. डीझेल अभावी टँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

     नगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. टँकर सुरू होत नसल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. १० एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी दिली. या गावांनी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टँकरला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून अद्याप पर्यंत टॅंकर गावांमध्ये आलेच नाहीत. 

     तिन्ही गावांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. भर उन्हात पाण्यासाठी महिला, लहान मुले वणवण भटकत आहेत. उन्हाळा संपत आला तरी पाण्याचे टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. प्रशासनाकडे वारंवार विनवण्या करून देखील उपयोग होत नाही. त्यामुळे तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी जेऊर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दारकुंडे यांनी सांगितले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

     माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली इमामपूर गावचे युवा नेते गणेश आवारे, ससेवाडी सरपंच दत्तात्रय जरे, माजी उपसरपंच शंकर बळे, बहिरवाडी सरपंच सौ. अंजना येवले, डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे, इमामपूर सोसायटीचे चेअरमन शिवाजी मोकाटे यांच्या उपस्थितीत समस्त ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

_________________________________________________________________

पिण्याच्या पाण्याच्या टँकर साठी उधारीवर डिझेल घेतले जायचे. पूर्वी ज्या दोन पंपांवरून डिझेल घेत होतो त्यांनी आता नकार दिला आहे. त्यामुळे टँकर सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर बाब वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. टॅंकरचे बिल हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग होतात व नंतर अदा केले जातात. हीच परिस्थिती इतर तालुक्यात देखील उद्भवलेली आहे.

..... रेश्मा होजगे (गट विकास अधिकारी, पंचायत समिती नगर)

____________________________________________________________________

जिल्ह्यात तीन मंत्री असुनही ही परिस्थिती

नगर जिल्ह्यात तीन मंत्री असूनही पिण्याच्या पाण्याच्या टँकर साठी प्रशासनाकडे डिझेलला पैसे नाही ही दुर्दैवी बाब आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकर साठी वेगळ्या निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. जेणेकरून उन्हाळ्यात गावातील नागरिकांचे हाल होणार नाहीत. उन्हाळा संपत आला तरी टॅंकर सुरू झाले नाही. त्यामुळे महिला व लहान मुलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

.....राजु दारकुंडे ( भाजप तालुका उपाध्यक्ष)

______________________________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post