टँकर डिझेल प्रकरण.... पंचायत समिती प्रशासनाची पत कर्डिले यांनीच घालवली जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचा आरोप

  


माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- नगर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे डिझेल प्रकरण चांगलेच गाजत आहे. डिझेल अभावी टँकर सुरू होत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाची पत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीच घालवली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते संदेश कार्ले यांनी केला आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील सहा गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून टँकर साठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ससेवाडी बहिरवाडी इमामपूर या तीन गावांचे टँकर मंजूर झालेले आहेत. तर बाळेवाडी, मदडगाव, नारायणडोहो या गावचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

    ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर गावचे टँकर मंजूर असूनही डिझेल ऊधार मिळत नसल्याने टॅंकर सुरू झालेले नाहीत. तिन्ही गावांनी तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसह मंगळवार (दि. १०) रोजी जेऊर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजु दारकुंडे यांनी दिला आहे.

       त्यावर बोलताना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका करताना कर्डिले यांनीच पंचायत समिती प्रशासनाची पत घालविली असल्याचा आरोप केला. सन २००२ ते २००७ या कालावधीत माजी आमदार कर्डिले यांच्या ताब्यात पंचायत समितीची सत्ता असताना झालेल्या टँकर घोटाळ्यात डिझेल पंपधारक तसेच सरकारी टँकर करिता स्पेअर पार्ट पुरविणारे दुकानदार यांचे पैसे बुडाले.ते न्यायालयात गेले असता न्यायालयाने आदेश दिला तरीही त्यांचे कागदपत्र पोलिसांकडे असल्याने त्यांचे पैसे प्रशासनाने अदा केलेले नाहीत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाची पत ही कर्डिले यांनीच घातली आहे असे कार्ले सांगितले.

     टँकर घोटाळ्यात एका पंपावरून चोवीस तास जरी डिझेल सोडत राहिले तरी एवढी उधारी होणार नाही तेवढी उधारी एका दिवसाची दाखविण्यात आलेली आहे. सदर प्रकरण त्यांनी दाबून ठेवले असले तरी ते पुन्हा उघड करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. ज्यावेळी टँकर सुरू होते त्यावेळी मी स्वतः डिझेल करिता वैयक्तिक पेट्रोल पंपधारकांना ॲडव्हान्स दिला होता. 

       पंपचालकाचे सुमारे दहा लाख रुपये उधारी होती. त्यांना ती उधारी देताना उशीर झाल्याने डिझेलच्या दरात होणा-या दरवाढीमुळे पंपचालकांचा तोटाच झालेला आहे. त्याने डिझेल देण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या एम.आय.डी.सी. येथील पंपावरून दोन वर्षांपूर्वी ९ लाख ७९ हजार रुपयांचे डिझेल उधारीवर घेतले आहे. त्यांचे बिल देणे अद्याप बाकी आहे. त्यावेळी डिझेल ६० ते ७० रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. आज डिझेल शंभर रुपयाच्या वर गेले आहे. याचा फटकाही पंपधारकांना बसलेला आहे. त्यामुळे कर्डिले यांनी आंदोलन करण्याची नौटंकी करू नये, असा सल्लाही संदेश कार्ले यांनी दिला आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------

 वैयक्तिक खर्चातुन टँकर सुरू करू

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून टँकरच्या डिझेलचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. तालुक्यातील काही गावांनी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने येत्या दोन दिवसांत यावर मार्ग काढण्यात येईल. यातुन मार्ग निघाला नाही तर वैयक्तिक खर्चातुन आम्ही टँकर सुरू करू. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांनी काळजी करू नये.

...... संदेश कार्ले (जिल्हा परिषद सदस्य)

______________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post