जेऊर प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा साजरा


माय अहमदनगर वेब टीम
 नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
     यावेळी ट्रॅक्टर मधून विद्यार्थ्यांची लेझीम, ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांचा शंभर टक्के प्रवेश व्हावा, त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण विभागाच्या उपक्रमा नुसार शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.
     दाखल पात्र मुलांचे औक्षण सरपंच राजश्री मगर यांनी केले. नवगतांचे स्वागत करताना प्रत्येक प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकासाच्या उद्देशाने शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या वनिता ढेपे यांच्या हस्ते शाळा पूर्वतयारी विकास पत्राचे वाटप करण्यात आले.
      रांगोळी, रंगीबेरंगी फुगे, स्टॉल, सेल्फी पॉईंट अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी चांगलेच रमले होते. निवृत्त शिक्षिका श्रीमती इंगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाबागोसावी यांनी केले. शाळापूर्व तयारी मेळावा घेण्याबद्दल ची माहिती शिक्षीका राऊत यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बाबागोसावी, शिक्षक वाघ, निमसे, काकडे, शेख, शिंदे, भालेराव, राऊत, परभणे यांनी परिश्रम घेतले.
      या उपक्रमासाठी सरपंच राजश्री मगर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा अनुजा आरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post