गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी हाल


  माय अहमदनगर वेब टीम

 जेऊर परिसरातील परस्थिती ; वनविभागाने पाण्याची सोय करावी

 नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर परिसरात असणाऱ्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमधील वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल होत असून वनविभागाने पाण्याची सोय करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिकारे यांनी केली आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील इमामपूर, ससेवाडी, धनगरवाडी, चापेवाडी, बहिरवाडी याठिकाणी गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वन विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून या परिसरात वन्यप्राणी व विविध पक्षांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आढळून आलेले आहे. त्यामध्ये हरिण, काळवीट, कोल्हा, लांडगा, ससा, तरस, खोकड, साळींदर, रानडुक्कर, मोर याबरोबरच विविध जातींचे पक्षी दिसून आले आहेत. याच परिसरात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.

      उन्हाळा सुरू झाल्यानंतर डोंगर रांगांमधील पाणी संपल्याने वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ मानव वस्तीकडे धाव घेताना दिसून येतात. मानव वस्तीकडे आल्यानंतर कुत्र्याकडून शिकार तसेच महामार्गावर अपघात होऊन वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने काही ठिकाणी पाणवठे बनवले आहेत तर अनेक ठिकाणी पाठवठेच नाहीत. पाणवठे बनवले असले तरी त्यामध्ये पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

       तरी वन विभागाने इमामपूर, डोणी परिसर, ससेवाडी, बहिरवाडी, धनगरवाडी, चापेवाडी परिसरातील डोंगररांगांमध्ये वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिकारे, माजी चेअरमन अर्जुन शिकारे, व्हाईस चेअरमन नवनाथ म्हस्के, किशोर शिकारे, माजी सरपंच बाळासाहेब शिकारे, अशोक विरकर, सखाराम गवळी, यांच्यासह जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

_____________________________________

 वन्य प्राण्यांचे अतोनात हाल

 जेऊर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने वन्य प्राणी व पक्षी यांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरू आहेत. वन विभागाने तात्काळ वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असुन पोषक वातावरणामुळे परिसरातील वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

    ......सुनिल शिकारे ( सामाजिक कार्यकर्ते, धनगरवाडी)

__________________________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post