इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई


 माय अहमदनगर वेब टीम 

टँकर सुरू करण्याची मागणी; पाण्यासाठी वणवण भटकंती 

नगर तालुका- नगर तालुक्यातील इमामपूर, बहिरवाडी तसेच ससेवाडी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर, बहिरवाडी तसेच ससेवाडी हे तिन्ही गावे डोंगर उतारावर वसलेले आहेत. पावसाळ्यात पहिल्याच पावसात पाण्याची भूजल पातळी वाढते तर उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.

      सद्यस्थितीत गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. शासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती संबंधित गावच्या सरपंचाकडून देण्यात आली आहे. पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती सुरू आहे.

      तसेच डोंगर रांगातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे डोंगररांगांमध्ये पाणवठे बनवुन वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने पाण्याची सोय करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

      इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, बहिरवाडी सरपंच सौ. अंजना येवले, ससेवाडी सरपंच दत्तात्रय जरे यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

__________________________________

 पाण्यासाठी वणवण भटकंती 

इमामपुर, बहिरवाडी, ससेवाडी गावे डोंगर उतारावर वसलेले असल्याने येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याची समस्या निर्माण होत आहे. या गावांनी शासनाने त्याला तात्काळ टँकर सुरू करावेत. तसेच या तिन्ही गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

.....सौ अंजना येवले (सरपंच बहिरवाडी)

_______________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post