पांढरीपुल येथील अपघातांची मालिका थांबता थांबेना !

 


कंटेनरच्या धडकेत एक ठार; गतिरोधक काढण्याची मागणी

नगर तालुका- नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवार दि. ११ रोजी झालेल्या कंटेनरच्या अपघातात एक जणाचा बळी गेला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावर घाटाच्या पायथ्याशी अपघातांची मालिका सुरू आहे. येथे झालेल्या अपघातात आज पर्यंत सुमारे तीस ते चाळीस जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. येथील गतिरोधकामुळे अपघात होत असून ते काढून टाकण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

       टेम्पो चालक हा आपला टेम्पो (क्र. एम.एच. १२ क्यु.जी.१२१७) रस्त्याच्या कडेला उभा करून स्वतः रस्त्याच्या बाजूला उभा असताना त्याला नगरकडुन औरंगाबाद कडे जाणा-या कंटेनरने (क्र. आर.जे.३२ जी.बी. ०००३) जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

      पांढरीपुल परिसरात तीव्र उतारामुळे गतिरोधक लक्षात येत नसल्याने अपघात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बोरुडे वस्ती, साळवे वस्ती, चोथे वस्ती येथील नागरिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात घडलेली आहेत. गतिरोधकाजवळ आवश्यक ते फलक, लाइट व इतर उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

     तरी येथील गतिरोधक तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी संतोष बोरुडे, बाळासाहेब काळे, भाऊसाहेब बोरुडे, आसाराम चोथे, बडे मामा, संजय बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post