नगर तालुक्यातील गावागावात 'झेंडा' वादाचे लोण पसरले ! जाती-जातीत तेढ निर्माण होण्याची शक्यता ; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज 

नगर तालुका- नगर तालुक्यातील ग्रामीण भागात झेंडा लावण्याबाबतचे लोण चांगलेच पसरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात जाती-जातीत तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे तत्काळ लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील गावा गावांमध्ये विविध रंगाचे झेंडे लावण्याचे फॅड आले आहे. महामार्ग तसेच महामार्गालगत उंच झेंडा लावून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न गावात होताना दिसून येत आहे. यामधून जाती-जातीत तेढ निर्माण होऊन भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावण्यासाठी गावांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच कारणांवरून तालुक्यात वादाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. झेंड्याच्या कारणामुळे गावातील जातीय सलोखा धोक्यात आला आहे. झेंडा लावण्याच्या  फॅडचे लोण हळूहळू तालुक्यातील प्रत्येक गावात पसरत असून वेळीच यावर बंधने लादली गेली नाही तर भविष्यात निश्चितच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

     अनेक गावातील कार्यकर्ते एकत्र जमून झेंडा लावण्याची परवानगी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण गर्दी जमून झेंडा विनापरवानगी लावत आहेत. त्याविरोधात प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. झेंडा वादामुळे गावातील जातीय सलोखा धोक्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी आपला गट तयार करून लोकवर्गणी करत आपला झेंडा उंच व मोठा कसा लागेल तसेच गावच्या प्रथम दर्शनी भागात झेंडा लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

     झेंडा वादा पुढे प्रशासनही हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे. कोणाची तक्रार येत नसल्याने पोलीस कारवाई करत नाहीत. तसेच विविध खात्यांच्या शासकीय जागेवर झेंडा लावण्याचे उद्योग गावागावांमधून सुरू झाले आहे.

      नगर तालुक्यातील जेऊर गावात तर झेंडा वादाचे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका झेंड्यासाठी ग्रामपंचायत कडून ना हरकत घेण्यात आल्यानंतर इतर तीन ते चार गट आम्हालाही झेंडा लावण्याची ग्रामपंचायत कडून रीतसर परवानगी मिळावी यासाठी अर्ज करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. यामुळे जेऊर गावातील जातीय सलोखा धोक्यात आला आहे.

      ग्रामपंचायतीनेही ना हरकत देताना गावात जातीय सलोखा टिकून राहील, जागेचा उतारा, नकाशा, झेंड्याची उंची तसेच यापासून गावात जातीय तणाव वाढणार आहे किंवा नाही या सर्व बाबींचा विचार करून ना हारकत देणे गरजेचे आहे. सर्वधर्मसमभाव ही संस्कृती आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जोपासली जात असली तरी या झेंड्याच्या राजकारणामुळे जातीय सलोख्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

_____________________________________

शांतता समितीच्या बैठकीत होणार चर्चा 

होर्डिंग, पोस्टर, झेंडे लावण्याबाबत ची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांची आहे. त्यांनी नोटिसा देऊन पुढील कारवाई करणे गरजेचे आहे. शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील उपस्थित राहणार आहेत. शांतता समितीच्या बैठकीत हा विषय घेऊन सविस्तर चर्चा करणार येईल व त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

....राजेंद्र भोसले (जिल्हाधिकारी)

______________________

ग्रामीण भागातील संस्कृतीला तडा जाण्याची शक्यता

आजही ग्रामीण भागात सर्व धर्म समभाव ही संस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते. अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदताना दिसुन येतात. ग्रामीण भागात सर्व सण-उत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. परंतु या झेंडा वादामुळे ग्रामीण भागातील चांगल्या संस्कृतीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तात्काळ या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

_______________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post