घोसपुरीत श्री.पद्मावती देवीचा रविवारी वार्षिक चैत्र यात्रोत्सव*तीन वर्षांच्या कालावधी नंतर सोमवारी रंगणार इनामी कुस्त्यांचा आखाडा*

माय अहमदनगर वेब टीम -

 - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री.पद्मावती देवीचा वार्षिक चैत्र यात्रोत्सव रविवारी (दि.१७) रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने गावकऱ्यांनी लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून सोमवारी (दि.१८) इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव व कुस्त्यांचा आखाडा झालेला नव्हता, त्यामुळे ३ वर्षानंतर होणाऱ्या या गावच्या सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. 

घोसपुरी गावच्या श्री.पद्मावती देवीचे काच मंदिर संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी नवरात्र तसेच चैत्र महिन्यात येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा यात्रोत्सव व कुस्त्यांचा आखाडा भरत असतो. या यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी गावकारभाऱ्यांची बैठक नुकतीच देवी मंदिरात झाली.या बैठकीस गावातील सर्व प्रमुख गावकारभाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत रविवारी (दि.१७) मुख्य यात्रोत्सव व सोमवारी (दि.१८) कुस्त्यांचा आखाडा असे नियोजन सर्वानुमते करण्यात आले. यामध्ये यात्रेच्या दिवशी सकाळपासून देवीची पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सायंकाळी श्री.पद्मावती देवी व खंडोबा पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सदर यात्रोत्सव गावचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येत तो शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

घोसपुरी गावच्या कुस्ती आखाड्यात दरवर्षी राज्यभरातून नामवंत मल्ल हजेरी लावत असतात.या कुस्ती मल्ल विद्येला प्रोत्साहन देण्यासाठी ३ वर्षानंतर घोसपुरी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या इनामी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post