सारोळा कासार येथील कडूस परिवाराचा उपक्रम ; ३ विद्यालयांच्या इमारत बांधकामालाही दिला निधी
माय अहमदनगर वेब टीम –
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका असलेल्या असलेल्या आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आईने ज्या ज्या शाळांमध्ये सेवा केली अशा ७ शाळांना ग्रंथालयासाठी लोखंडी कपाटे आणि प्रत्येकी १७० ते १८० पुस्तके भेट देण्याबरोबरच ३ विद्यालयांच्या इमारत बांधकामालाही मदत निधी देण्याचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कडूस परिवाराने राबविला आहे.
सारोळा कासार येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका कै.चंचला रावसाहेब कडूस यांचे गतवर्षी कोरोनाने निधन झाले होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांची शिक्षक असलेली मुले राम कडूस व रवी कडूस यांनी त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगर तालुक्यातील रूईछत्तीशी, बाबुर्डी बेंद, शिरकांड मळा (वाळकी), घोसपुरी, सुभाष वाडी (सारोळा कासार), कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा व श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ग्रंथालयासाठी लोखंडी कपाटे आणि पुस्तके भेट देण्यात आली. याशिवाय सारोळा कासार येथील कर्मवीर विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५० हजार, खडकी येथील तुळजाभवानी विद्यालयासाठी ११ हजार व आष्टी येथील गंगादेवी विद्यालयासाठी ११ हजार देणगी देण्यात आली. याशिवाय गावातील महिला भजनी मंडळाला टाळ,सतरंजी व इतर साहित्यासाठी ११ हजार, आळंदी येथील श्रीकृष्णदास लोहिया महाराज आश्रमासाठी ५ हजार देणगी देण्यात आली. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना शामची आई, शिवाजी कोण होता या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवचरित्रकर ह.भ.प.सुसेनमहाराज नाईकवाडे यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमास निवृत्त महसूल उपायुक्त नानासाहेब बोठे, रयतचे माजी सचिव शिवाजीराव भोर, आ.निलेश लंके, शिक्षणाधिकारी अरुण धामणे, अशोकराव कडूस, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र कापरे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, बापूसाहेब तांबे, मुख्याध्यापक किशोर तळेकर, श्री.बागुल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment