वाळकीत सेवा सोसायटी निवडणुकीत बोठेच किंग; विरोधकांना...वाळकी सोसायटीवर सत्ताधारी भाऊसाहेब बोठे गटाचेच निर्विवाद वर्चस्व; विरोधकांचा १३-० ने केला पराभव

माय अहमदनगर वेब टीम –

नगर तालुक्यातील राजकियदृष्ट्या सर्वाधिक महत्वाच्या असलेल्या वाळकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर उद्योजक भाऊसाहेब बोठे प्रणित शेतकरी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. गेल्या ३५ वर्षांपासून भाऊसाहेब बोठे गटाचे सोसायटीवर वर्चस्व आहे. ते वर्चस्व अबाधित ठेवण्यात ते यशस्वी ठरले. विरोधकांनीही पहिल्यांदाच सोसायटी निवडणुकीत कडवी झुंज दिली. मात्र विरोधकांची कडवी झुंज अपयशी ठरली. सोसायटीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १३ जागा शेतकरी पॅनलने सुमारे २०० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकल्या. सोसायटीचा निकाल जाहीर होताच शेतकरी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १५) फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. 

वाळकी सोसायटीची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी होईल, असे वाटत होते. मात्र ज्येष्ठ नेते एन. डी. कासार, नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती रंगनाथ निमसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस राम भालसिंग,सुहास कासार, आप्पासाहेब भालसिंग आदी नेत्यांनी निवडणुकीत वज्रमूठ बांधली. उद्योजक भाऊसाहेब बोठे यांच्या विरोधात त्यांचे सर्व विरोधक एकत्र आले. भाऊसाहेब बोठे यांनी शेतकरी विकास पॅनलचे तर निमसे, कासार, भालसिंग यांनी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व केले. सर्व विरोधकांनी वज्रमूठ बांधल्याने वाळकी सोसायटी निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. कधी नव्हे एवढी चुरस वाळकी सोसायटीत पहावयास मिळाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विजयाचा दावा दोन्ही पॅनलच्या प्रमुख करत होते. शेवटी मतदारांनी त्यांचा कौल शेतकरी पॅनललाच दिला. 

दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. शुक्रवारी (दि. १५) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत झाली. मतदानानंतर लगेचच मतमोजणी पूर्ण होवून निकाल जाहीर झाला. शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे १३ जागा जिंकून सोसायटीवर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. विरोधकांनीही या निवडणुकीत चांगलीच झुंज दिली. मात्र त्यांची झुंज विजयापर्यंत पोहोचू शकली नाही. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची ही रंगीत तालीम ठरली असून, या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. उद्योजक भाऊसाहेब बोठे वाळकी सोसायटीच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. ग्रामपंचायतीवरही त्यांचेच वर्चस्व आहे. त्यांच्या सुनबाई स्वाती शरद बोठे सरपंच पदावर कार्यरत आहेत. सोसायटीच्या विजयामुळे बोठे गटात नवचैतन्य पसरले आहे.

*निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते* 

सर्वसाधारण मतदार संघ – रमेश नामदेव धोंडे (७४९ मते), रामदास गुलाब कासार (७४२ मते), अमृत रामभाऊ काटकर (७३८ मते), सुरेश दत्तू भालसिंग (७३६मते), चंद्रभान सूर्यभान बोठे (७३५मते), सोपान नाथा कासार (७३१मते), ईश्वर बाळासाहेब बोठे (७२५मते), विजय कुंडलिक भालसिंग (७२२ मते), 

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ - संग्राम बंडू गायकवाड (७७२ मते), 

महिला राखीव मतदार संघ – रंजना शिवाजी कासार (४४७ मते), विमल रावसाहेब भालसिंग (७११मते), 

इतर मागासवर्गीय मतदार संघ - केशव नाथा नाईक (७४८ मते), 

भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ - शिवराम लक्ष्मण धोत्रे (७४८ मते)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post