खिडकीचे गज कापून आरोपी पळाले

 


राहुरी : येथील तुरुंगाताली पाच आरोपी खिडकीचे गज कापून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी तीन आरोपींना पकडण्यात यश आले असून दोन जण अद्याप फरार आहेत. या दोघांना शोधण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.


मोक्का गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या गुन्हेगारांसह पाच आरोपींनी जेलमधून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. जेलच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून पळून जाणार्‍या पाच जणांपैकी तिघे जणांना पोलिसांनी पकडले आहे. तर उर्वरीत दोघे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनाकडून जिल्हाभर शोधाशोध सुरू झालेली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी तातडीने धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. नगर व पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून टाकणारे सागर भांड टोळीतील आरोपींना दरोडा प्रकरणात पोलिसांनी शिताफीने पकडले होते. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला सागर भांड व त्याच्या साथीदारांनी अनेक ठिकाणी दरोडे, चोरी, दहशत निर्माण करणे, गावठी कट्यांचा वापर करून सर्वसामान्यांना जेरीस आणले होते. विविध पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.


अशा आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळी भांड प्रकरणातील आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखला. जेलमध्ये पाठीमागील बाजुला असलेल्या खिडकीचे गज कापण्यात आले. आरोपींनी रात्रीतून जेलमधून पळ काढला. पाच जण लपून पळत असल्याचे रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले. सहायक पोलिस निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, दीपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे, रंगनाथ ताके, कोळगे यांनी पाणीटाकी परिसरात सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. यामध्ये तीन जण पोलिसांच्या हाती लागले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post