हे तर भाजपचे पाप, धनंजय मुंडे कडाडले
 कर्जत : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज, शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षण जाण्याचे खरे पाप हे भाजपचे आहे,’ अशी जोरदार टीका मुंडे यांनी कर्जत येथे बोलताना केली आहे.


कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली. आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंडे यांनी ओबीसीच्या प्रश्नावरून जोरदार टीका भाजपवर केली. ते म्हणाले, ‘मंडल आयोग देशामध्ये लागू करताना सर्वात प्रथम शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू केला होता, ही येथील जनता विसरलेली नाही. केंद्र सरकारने डाटा दिला असता, तर महाराष्ट्राचे राजकीय आरक्षण रद्द झाले नसते. यामुळे भाजपला राज्य सरकारवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.’


भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, ‘बारा खाते मंत्रीपद असताना देखील आमदार रोहित पवार यांनी भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला. एवढेच नव्हे तर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक प्रभाग बिनविरोध केला. इतर प्रभागातील उमेदवार देखील पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. यावरून या मतदारसंघांमध्ये आता काय होणार, हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post