नगर : कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ज्या उमेदवारासाठी भाजपच्या नेत्यांनी सभा घेतली, तोच उमेदवार सायंकाळी राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा चांगलाच संताप झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकारावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागत आहे, असे पाटील म्हणाले आहेत.
भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कर्जत नरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संघर्ष चांगलाच पेटला आहे. काल, शुक्रवारी सकाळी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी ज्या भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली, त्याच उमेदवाराने सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रकाराने भाजपच्या नेत्यांचा चांगलाच संताप झाला आहे. शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर आली. हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. शरद पवार यांचा वारसा,राज्यात सत्ता,अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते. याचाच अर्थ जनता भाजपासोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असे माझे तेथील कार्यकर्त्यांना आवाहन आहे,असे ट्विटच पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, कर्जत नगरपंचायतीची निवडणूक राज्यभर गाजत असून या निवडणुकीवर आता भाजपचे वरिष्ठ नेतेही लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
Post a Comment