“सत्तेवर येऊन सात वर्षे झाले पण महागाईचा राक्षस आणखी मारता आला नाही

 


माय वेब टीम

मुंबई - केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचं सरकार बहुमताने निवडून दिलं. मात्र सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केलीये.

महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

संतापाची बाब अशी की, सरकारने पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा महागाईच्या आगीत तेल ओतण्याचा उद्योग केला आहे. याच महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारने गॅस सिलिंडरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढविले होते. सरकारने घरगुती गॅसच्या दरात तर जबर वाढ केलीच, पण चहा टपरीपासून छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक, केटरिंगचालक जो व्यावसायिक गॅस वापरतात, त्यात तर तब्बल 84 रुपयांची भयंकर वाढ करण्यात आली. ही दरवाढ कधी? तर जेव्हा कोरोनामुळे सगळे काही ठप्प पडले आहे तेव्हा! कोरोनासारख्या संकटकाळात गॅस सिलिंडरचे दर 25 आणि 84 रुपयांनी वाढविणे याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, असंही अग्रलेखात म्हटलंय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post