माय वेब टीम
राहुरी - राहुरी नगरपरिषदेच्या सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्थेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला असून शहरासह वाड्या-वस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून बसविलेले दिवे चार-पाच दिवसापासून बंद असल्याचा आरोप विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केला आहे.
नगरपरिषदेमध्ये ठराविक नगरसेवकांचे ठेकेदारी राज सुरू असून कर भरणार्या नागरिकांच्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करताना कराच्या पैशाची मात्र, वारेमाप उधळपट्टी करून ठेक्यांच्या रूपात ठराविक नगरसेवकांच्या खिशात जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नगरपरिषदेने केलेल्या भुयारी गटारांची कामे अत्यंत निकृष्ट स्वरूपाची असून यातून पाणी जाणे तर सोडा, परंतु शहरातील रस्ते, गल्लीबोळातील रस्त्यांची वाट लावलेली दिसते.
मल्हारवाडी रोडवरील गटारातील पाणी वाहून जाण्याऐवजी नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी उलटे येत आहे, अशा तक्रारी येथील नागरिकांकडून येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर परिषदेच्या प्रत्येक ठेक्यामध्ये सत्ताधारी ठराविक नगरसेवकांची भागीदारी असून त्यामुळे कामांचा दर्जा पूर्णपणे लयाला गेला आहे.
खरे ठेकेदार निविदा किंमतीपेक्षा कमी किंमतीत कामे करण्यास तयार असताना त्यांना विविध कारणे दाखवून डावलण्यात येऊन 10 ते 15 टक्के दराने ठेके देऊन मर्जीतील नगरसेवकांच्या भागीदारीतील ठेकेदार नेमले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यातून निकृष्ट दर्जाची कामे होतानाच नागरिकांच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नगरपरिषदेच्या इलेक्ट्रिक कामाचा ठेका देताना गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेचे इलेक्ट्रिक रिवाइंडिंग व इतर कामे चांगल्या प्रकारे करीत असलेल्या राहुरीतील ठेकेदाराला नाकारून एका माजी नगराध्यक्षांच्या पतीने खास दबाव आणून आपली भागीदारी सामावून घेणार्या बाहेरील ठेकेदारास देण्यात भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांकडून कररूपाने पैसा गोळा करणार्या नगरपरिषदेत ठराविक सत्ताधारी नगरसेवकांचे टेंडर आज सुरू असून यातून नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी योजण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असून नगरपरिषदेच्या पैशाची मात्र, वारेमाप उधळपट्टी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Post a Comment