13 राज्यांतील सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1’माय वेब टीम  

मुंबई - मोठ्या राजकिय खेळीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण सरकार स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यातच कोरोनाने देशभर थैमान घातलं. या काळात कोरोना व्यतिरीक्त कोणतीही मोठी कामं सरकारला करता आली नाही. त्यातच ठाकरे सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोप वारंवार भाजपकडून करण्यात येत होता. त्यातच आता एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत.

प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता. सुमारे 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे. कोरोना काळात केलेल्या कामावरून जनतेने हा कौल दिला आहे.

जनतेने दिलेल्या कौलानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देशात नंबर वन ठरले आहेत, तर त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी आहेत. तर सतत चर्चेत असलेले आणि नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 5 व्या स्थानी आहेत.

दरम्यान, 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. 60 टक्के मतदारांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलं आहे. द प्रिंटने दिलेल्या या वृत्तानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post