अनिल देशमुखांच्या घराला केंद्रीय पथकाचा घेराव


 माय वेब टीम 

नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री (Former Maharashtra Home Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate) छापे टाकलेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात (Nagpur) नसून ते मुंबईत असल्याचं कळतंय. देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले.

       ईडीचे 5 अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी दाखल आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ईडीनं कारवाई सुरु केली आहे. 16 जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते.

देशमुखांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या तुकड्याही तैनात आहेत. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. सध्या नागपुराच्या घरात देशमुखांचा मुलगा सलील देशमुख, सून, आणि पत्नी घरी असल्याची माहिती मिळतेय.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना 5 एप्रिल रोजी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post