राज्याची रोज १५ लाख लसीकरणाची तयारी


माय वेब टीम 

 मुंबई  - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने दैनंदिन १५ लाख कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची तयारी ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.

कोरोनाछटा तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे. जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले. त्यावेळी बोलताना कोरोनाला प्रतिबंध करणारी त्रिसूत्री पाळण्याचा पुनरुच्चार केला.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेड रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे, ते पाहून सावध राहावे लागेल. पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे ठाकरे यांनी सांगितले.

'सह्याद्री' अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post