..म्हणून राठोड, देशमुखांनंतर अजित पवारही भाजपच्या रडारवर माय वेब टीम 

मुंबई - अनिल देशमुख, संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजपने आपला मोर्चा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला असून परमबीर प्रकरणात अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी तसा ठराव करण्यात आल्यामुळे भाजपचे पुढील लक्ष्य हे अजित पवार असतील याचे संकेत मिळाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय अारक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

दादरमध्ये मुंबई भाजप कार्यालयात गुरुवारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे देशमुखांना पायउतार व्हावे लागले. तत्पूर्वी, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता अजित पवार यांना भाजपने लक्ष्य करण्याचे ठरवले आहे.

अजित पवार दुखरा कोपरा
दीड वर्षापूर्वी भाजपने अजित पवार यांच्या साथीने पहाटे पहाटे सरकार स्थापन केले होते. मात्र आता अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केल्याने ते भाजपपासून दुरावल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा कार्यकारिणीत ठराव झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. फडणवीस यांनीही अँटिलियाप्रकरणी वाझेचा उल्लेख केला, मात्र अजित पवारांवर टीका केली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post