डोळ्यांमध्ये मिरचीपूड टाकून शिवसेना शहरप्रमुखाची हत्या

 


माय वेब टीम 

अमरावती -  अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहरातील बसस्थानकाजवळील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी २६ जूनला रात्री सव्वा दहाच्या सुमारास जुन्या वादातून शिवसेनेच्या शहर प्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच चौघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, तर अन्य एक जण फरार आहे. अमोल जनार्दन पाटील (३८, रा. तिवसा) असे मृतकाचे नाव असून, तो शिवसेनेचा शहर प्रमुख होता. संदीप रामदास ढोबाळे (४०), प्रवीण रामदास ढोबाळे (३६), अविनाश एकनाथ पांडे (३०) व रूपेश घागरे (२२) चौघेही रा. तिवसा अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अमोल पाटील हा आपल्या एका मित्रासोबत दारू पिण्यास आशीर्वाद बारमध्ये गेला होता. तेव्हा बारसमोर जुन्या वादातून मृतक अमोल पाटील व आरोपींमध्ये झटापट झाली. त्यांनी अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच ठाणेदार रिता उईके या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेनंतर त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासातच उपरोक्त चौघांना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली, तर एक आरोपी फरार असल्याची माहिती ठाणेदार रिता उईके यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहे. ही कारवाई तिवसा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि विजय गराड, एएसआय मुलचंद भांबुरकर, पोकाँ सुनील केवतकर, नापोकाँ संतोष तेलंग बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चालक नितीन कळमकर यांनी केली.

अनेक गंभीर गुन्हे; तडीपारीचा काढला होता आदेश
अमोल पाटील यांची हत्या जुन्या वादातून झाली असल्याचे पोलिस सूत्रांनी माहिती देताना सांगितले. यापूर्वी त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती, तर तो वाळूचा व्यवसाय देखील करीत होता. त्याची हत्या ही नियोजित कट रचून करण्यात आली असून, या घटनेपुर्वी आरोपी अविनाश पांडे याने बार मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले असल्याचे ठाणेदार उईके यांनी माहिती देताना सांगितले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी धाव घेत घटनेविषयी माहिती जाणून घेतली. मृतक पाटील याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला दीड महिन्यापूर्वी पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपारीचा आदेश देखील काढला होता. मात्र त्यावर त्याने स्टे आणल्याने तो शहरातच होता.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहाेचून आरोपी निष्पन्न होताच त्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली. काही तासात चौघांना अटक केली. त्यातील एक आरोपी फरार असून, त्याला लवकरच अटक करू. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post