बिहारने जंगलराज नाकारले!; नितीश यांच्याबद्दल फडणवीस म्हणाले...
 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई:बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर बिहारचे प्रभारी म्हणून धुरा वाहणारे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालांवर आपली प्रतिक्रिया ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. 

बिहारमध्ये निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेत जनतेला विकासाच्या बाजूने मतदान करण्याची साद घातली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रमुख केंद्रीय मंत्री बिहारच्या प्रचारात उतरले होते. त्याला यश मिळाले असून बिहारमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार हेसुद्धा जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले.

बिहार निवडणुकीदरम्यान फडणवीस यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारमध्ये जाता आले नाही. करोनावर मात केल्यानंतर ते सध्या विश्रांती घेत असून बिहारच्या यशावर त्यांनी रात्री उशिरा आपली प्रतिक्रिया दिली. 'आम्हाला जंगलराज नको तर विकास हवा आहे, हे बिहारच्या जनतेने आज स्पष्ट केले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असून नितीशकुमार यांच्यावरही विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी बिहारच्या जनतेला मी कोटी कोटी धन्यवाद देतो', असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post