मंत्रिमंडळात फेरबदल नाही : पवार

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई -  भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे गेल्या चार वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले माजी अर्थ व नियोजनमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला नाहक विविध चौकशांच्या पिंजर्‍यात अडकवून आपल्या विरोधात राजकारण केले, अशी भावना व्यक्‍त करत खडसे यांनी, आता पक्ष सोडल्यामुळे मला ईडी लावाल तर तुमच्या सीडी बाहेर लावेन, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे नाव न घेता इशारा दिला.


खडसेंचा हा गर्भित इशारा राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा संघर्षाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची स्थिती मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त करत मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे सांगितले.


एकनाथ खडसे यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. खडसेंच्या आजच्या पक्षीय सीमोल्लंघनाने छगन भुजबळ यांच्या काँग्रेस प्रवेशाची आठवण करून दिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी शिवसेनेचे लढाऊ नेते छगन भुजबळ यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर भुजबळ यांचा वापर शिवसेनेवर शरसंधान करण्यासाठी केला होता. आता खडसेंच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर तीर मारला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रवेशावेळी खडसे यांनी भाजपच्या एकाही नेत्याचे थेट नाव घेतले नाही. मात्र, त्यांचे टार्गेट फडणवीस हेच होते, हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते.


आपल्या मनातील खदखद व्यक्‍त करताना खडसे म्हणाले, आपण  भ्रष्टाचार केला, भूखंड घेतले, असे आरोप आपल्यावर करण्यात आले. परंतु काही दिवस थांबा, कुणी काय केले, कोणी किती भूखंड घेतले ते आपण दाखवतो. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहे, असेही खडसे म्हणाले.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आजचा हा आनंदाचा दिवस असल्याची भावना व्यक्‍त केली. ते म्हणाले, खानदेश हा एकेकाळी महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या विचाराने चालणारा भाग होता. मात्र, खडसे यांच्या प्रयत्नांमुळे या भागांमध्ये भाजपची ताकद वाढली. त्यांनी नवीन पिढी येथे उभी करून भाजपला बळ दिले.  आता खडसे यांच्या माध्यमातून खानदेशमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्‍त केली.


अजित पवार, जितेंद्र आव्हाडही नाराज नाहीत ः पवार


उपमुख्यमंत्री अजित पवार हे विलगीकरण कक्षात असताना खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे ते नाराज असल्याचे वृत्त निराधार आहे. तर खडसे यांच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद गमवावे लागेल, असे चित्र प्रसार माध्यमांनी रंगवले असल्याचे पवार म्हणाले. खडसे कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षात आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात बदल होणार नाही. जे आहे तसेच राहतील, अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मागील पाच वर्षांमध्ये भाजपने सुडाचे राजकारण केले. सत्तेचा वापर करून त्यांनी विरोधी पक्षनेत्यांमागे विविध चौकशांचा ससेमिरा लावला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post