राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला!; 'हा' भाजप नेता म्हणाला...


माय अहमदनगर वेब टीम

नगर: 'सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी एकनाथ खडसे  विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. आता ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच एकनाथ खडसे यांना प्रवेश देत त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय,' असा घणाघाती आरोप भाजप नेते व माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केला आहे. 'खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कोणतीही भरतीओहटी येणार नाही,' असा दावाही त्यांनी केला आहे. ते कर्जत येथे माध्यमांशी बोलत होते. 

'भाजप ही देशात सर्वात मोठी पार्टी आहे. देशात या पक्षाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट आहे. भाजपकडे सर्वात जास्त राज्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत. तसेच काँग्रेस सोडता कोणत्याही पक्षाला देशात बहुमत मिळाले नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ते भाजपला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीकडे भरती वगैरे काही येणार नाही,' असा टोलाही शिंदे यांनी लगावला. 'जयंत पाटीलांनी सांगितले होते, दहा ते बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत. मग ते आज कुठे गेले?, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. 'आज एक देखील आमदार किंवा माजी आमदार खडसे यांच्यासोबत गेला नाही. त्यामुळे या फक्त सांगायच्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी सोडून कोणी जाणार नाही,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीने साक्षीदार फोडण्यासाठी खडसे यांना प्रवेश दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले, 'सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते मुख्य साक्षीदार होते. त्यामुळे त्या प्रकरणातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने आज केला आहे. परंतु, ही साक्ष होऊन गेली आहे. त्यामुळे या साक्षीदाराचा उपयोग राष्ट्रवादीला होणार नाही,' असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post