फेब्रुवारीपर्यंत कोरोना आटोक्यात


 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतातील संक्रमणाचा सर्वोच्च टप्पा कोरोनाने गाठला आहे, आता इथून कोरोनाची उतरंड सुरू झालेली आहे. रुग्णसंख्या कमी होत होत फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातून कोरोना संक्रमण आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असा दावा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विद्यासागर समितीने केला. 

रविवारी भारतात कोरोना संक्रमितांची संख्या 1कोटी 6 लाखांहून पुढे जाणार नाही, असा अंदाजही समितीने  बांधला आहे. भारतात सध्या कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव व्हावा म्हणून करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवावे लागतील, असा सल्लाही समितीने दिला आहे.

देशातील कोरोना स्थितीच्या एकूणच आकलनासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली होती. आयआयटी हैदराबाद येथील प्रा. एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. 

पंतप्रधानांची आढावा बैठक

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना आणि लवकरात लवकर उपलब्ध होईल अशा व्यवस्थेवर काम करायला हवे. लस वितरणाचे नियोजन करताना देशाची भौगोलिक रचना आणि वैविध्यही लक्षात घ्यावे लागेल, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लस उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेच्या नियोजन बैठकीत केल्या. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post