दसर्‍याला सोन्याच्या झळाळीत वाढ

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - गेल्या तीन वर्षांत प्रत्येक दसर्‍याच्या मुहूर्तावर सोन्याला चांगलीच झळाळी मिळत आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना गेल्या दोन वर्षांत तब्बल 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळालेला आहे. यंदा लॉकडाऊनमध्ये हुकलेले लग्‍नाचे मुहूर्त येत्या दोन महिन्यांत साधले जात असल्याने सराफ बाजारात दसर्‍याला सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता सराफ बाजाराने व्यक्‍त केली आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्‍ते कुमार जैन यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरांवर स्पष्टपणे दिसत आहे. सोन्याचे दर वरखाली होत असले, तरी दसर्‍याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत प्रचंड वाढ दिसत आहे. मुळात सोन्याचे दर आज 51 हजार 223 रुपयांवर गेलेले असताना मागणीत झालेल्या वाढीमुळे सराफांमधून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

दागिन्यांची बुकिंग सुरू आहे. लॉकडाऊन काळात विविध कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे अनेकांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरचे मुहूर्त पकडले. त्यातील बहुतेक वर व वधूची कुटुंबे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर दागिन्यांची ऑर्डर देत व घेत आहेत. म्हणूनच मागणीतही वाढ झाल्याचे दिसते. सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी प्रतितोळा सुमारे 32 हजार रुपयांवर असलेल्या सोन्याने आज 51 हजार रुपयांचा भाव ओलांडला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post