पूर-पावसाचे राज्यात १५ बळीमाय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर/मुंबई - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी- नाल्यांना पूर आला आहे. गुरुवारी पावसाचा पुन्हा तडाखा बसल्याने सोलापूर जिल्ह्यात 8, पुण्यामध्ये 6, तर सांगली जिल्ह्यात 1 अशा एकूण 15 जणांना जीव गमवावा लागला. गुरुवारी अनेक भागांत अक्षरश: ढगफुटी झाल्याचे चित्र होते. परिणामी, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, वायुसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. मनुष्यहानी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटी यामुळे राज्यात विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे 8 जण मृत्युमुखी पडले आहेत. पुणे जिल्ह्यात चौघांचा बुडून अंत    झाला आहे. तर सांगली जिल्ह्यात नदीमध्ये तिघे  वाहून गेले. यापैकी एका महिलेचा मृतदेह सापडला. दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. आणखी दोघांना वाचविण्यात यश आले. राज्यातील मृतांची संख्या 13 झाली आहे.कोल्हापुरात पावसाचा जोर रात्रभर कायम होता. रात्रभरच्या पावसाने पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेे आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 21.9 फुटांवर गेली आहे. शहरी भागात रस्ते पार उखडले आहेत. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भात ऊस, सोयाबिन, भुईमुगाला याचा फटका बसला आहे.

सांगलीत एक ठार, दोघे बेपत्ता

सांगली जिल्ह्यात एक महिला वाहून गेली. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी गावात ही घटना घडली. जयश्री संजय दरूरे असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती संजय दरूरे आणि वाहून जाणारी  आणखी एक व्यक्ती  धोंडीराम शिंदे यांना वाचविण्यात आले. मात्र आणखी दोघे बेपत्ता आहेत. तासगांव तालुक्यातील कौलगे येथे भिंत पडल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. सांगलीत नदीची पाणी पातळी वाढत असल्याने काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले

सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे सोलापूर हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणाचे 6 दरवाचे दिड फुटांनी उचलण्यात आले आहेत. पुण्यातही पावसाचा जोर कायम  होता. काही घरात पाणी शिरले. कोरोना सेंटरमध्येही पाणी शिरले.कोकणात पावसाचा जोर कायम असुन राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेेढले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. खारेपाटणमध्ये जोर कायम आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post