राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाड्यासह कोकणातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे.


“गेल्या ३-४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.


कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, मराठवाड्यातील अतिवृष्टी यापैकी एकाही प्रसंगात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहिले नाही. आता पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असतानाही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याबद्दल फडणवीसांनी सरकारची कानउघडणी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post